२०२४ हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे सार्थ त्रीशती वर्ष आहे याच प्रसंगाचे औचित्य साधून दिनांक २६ जून ते २९ जून २०२४ दरम्यान जळगाव येथे नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणावरती विश्वातील पहिले श्री.शिवचरित्र साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. शिवचरित्र सकारात्मक रीतीने पुढील पिढीस हस्तांतरित करावे या उद्देशाने इतिहास प्रबोधन संस्था आणि नूतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
पुण्यपुरुष छत्रपती शिवराय जगाच्या पाठीवरती शिवराय छत्रपती जाहले ही साधी गोष्ट जाहली नाही. शतकानू-शतक काळ्याकभीन्न काळाच्या पटलावरती ०६ जून १६७४ म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ रोजी रायगडावर राजांनी राज्याभिषेक करवून घेतला आणि जगाच्या पाठीवर हिंदू राष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली गेली. गुलामगिरी आणि अत्याचाराने खचलेल्या रयतेमध्ये एक नवा आशावाद पेरुन या एकाच क्षणाने भारतीय संस्कृतीचे पुनरुत्थान झाले.
छत्रपतींनी मातीतून माणसं उभी केली आणि त्याच माणसांच्या हातून अचाट असा पराक्रम घडवून आणला. जगाच्या पाठीवरती १६४५ ते १६८० हा उणेपुरे ३५ वर्षाचा काळ, पण याच काळात राष्ट्रासाठी आणि शिवरायांच्या निष्ठेपाई लोक मारायला आणि मरायला तयार होते.
तो एक जगाच्या पाठीवरचा सुवर्णकाळ होता. काय नव्हतं तिथं आर्थिक सुबत्ता होती, सामाजिक संरक्षण होते, नैतिक पाठबळ होते, सामाजिक धर्माचा अधिष्ठान होतं, देवाचे महत्त्व आणि देवाविषयी निष्ठा होती आणि याच काळात कलेची सुबत्ता होती हाच वास्तववादी इतिहास आम्हाला पुढच्या पिढीला हस्तांतरित करायचा आहे. शिवरायांचे एकच चरित्र अवघ्या सृष्टीला पुरून उरले आहे. शिवरायांचे चरित्र अवघ्या आसमंतात भरून पावली आहे. त्या शिवप्रभूंचे चरित्र साहित्य संमेलन म्हणजे नवतरुण आणि भविष्यातील पिढीला सकारात्मक दृष्टीने पुण्य पुरुषाच्या चरित्राचे अवलोकन व्हावे हाच एकमेव उद्देश या संमेलनाचा आहे. या संमेलनास बारा मावळ प्रांतातील नद्या आणि गडदेवता येणार आहेतच शिवाय शिवनेरीची नाती आणि रायगडाची माती पण येणार आहे, सोबत आपणही याच अपेक्षेने पुन्हा शिवविचारांचा जागर करुया. या संमेलनाच्या निमीत्ताने शिवरायांच्या स्वराज्य विषयीचा दृष्टीकोन म्हणजे बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार म्हणजेच मराठ मावळा हा संमेलनास सामील व्हावा हा उद्देश आहे.
संपूर्ण विश्वभरात हजारो साहित्य संमेलन आयोजित केले जातात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र साहित्यावर कधीही, कुठेही आणि कुणीही साहित्य संमेलन आयोजित केले नाही आणि आजवर ते कुठेही झाले नाही. त्या साहित्यावर मंथन व्हावे आणि त्यातून एक नवा वास्तववादी प्रवाह समाज क्षेत्रासाठी खुला व्हावा या उद्देशाने या संमेलनाच प्रयोजन होत आहे. जळगावात होणाऱ्या या विश्वस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटक सातारा गादीचे छत्रपती श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले हे असणार आहेत, तसेच या संमेलनाचे अध्यक्ष शककर्ते शिवराय या विश्वप्रसिद्ध ग्रंथाचे लेखक माननीय विजयराव देशमुख नागपूर हे असणार आहेत. या संमेलनास कोल्हापूर चे छत्रपती संभाजी महाराज, तंजावरच्या गादीचे वारस श्रीमंत शिवाजी राजे भोसले आणि नागपूर गादीचे वारस श्रीमंत मुधोजी राजे भोसले हे उपस्थित असणार आहेत.
शिवकाळातील छत्रपती शिवरायांचे सोबत असणारे ७५ सरदार घराण्यांचे वारसदार हे येणार आहेत. जसे सुभेदार तानाजी बाबा मालुसरे, यसाजी कंक, बाजीप्रभु देशपांडे, मुरारबाजी देशपांडे यांचे वंशज संमेलनात दाखल होणार असून, विश्वातील सर्वात मोठे नाणे संग्राहक श्री.किशोरजी चंडक सोलापूर, तुळजाभवानी शस्त्र प्रशिक्षण संस्था पुणे यांचे शत्रप्रदर्शन, तीनशे मराठयांच्या समाधीचे चित्ररुपी प्रदर्शन घेऊन इतिहासाचे अभ्यासक श्री. प्रवीण भोसले सांगली येथून येणार आहेत. तसेच श्री. संकेत गांगूर्डे यांचे पगडी प्रदर्शन आणि श्री. संतोष आवटी जालना यांचे चीत्र प्रदर्शन आणि श्री. सतीश दुधाने यांचे वीरगळ प्रदर्शन तसेच श्री. महेश पवार यांचे आरमार प्रदर्शन सादर होणार आहे.
या संमेलनात दिनांक २६ जुन रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर गोंधळ कार्यक्रम सादर करणारे श्री. राजाराम बापू कदम समूह परभणी यांचा गोंधळ जागरण कार्यक्रम होणारं असुन दिनांक २७ तारखेला शिवरायावरील पहिला पोवाडा लिहिणारे शाहीर अज्ञानदास यांचे वंशज श्री. हरिदास शिंदे अहिल्यादेवी नगर हे लोप पावत चाललेल्या शिवकाळातील कला हा कार्यक्रम सादर करणार आहेत. तर २८ जुन रोजी शाहीर प्रसाद विभुते सांगली यांचा पोवाडा गायन कार्यक्रम सादर होणार आहे. प्रस्तुत संमेलनास शिवपूर्वकालातील संत साहित्य आणि शिवोत्तर काळातील संत साहित्य या विषयावर परिसंवाद होणार आहे तसेच शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाची गरज त्याची उपलब्ध होईल या विषयावर देखील एक परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे.
शिवछत्रपतींचे चरित्र ही काळाची गरज या विषयावर एक प्रकट मुलाखत तसेच मराठ्यांची धारातिर्थे हा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होणार आहे. या संमेलनामध्ये श्रीशिवछत्रपतींचे चरित्र शक्ती आणि भक्ती, शिवछत्रपतींची पत्रे, श्रीशिवछत्रपतींना अवगत असलेले नकाशा तंत्र, भारतीय ज्ञान परंपरा आणि श्री. शिवछत्रपती, छत्रपतींचे मुलकी व्यवस्थापन, छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यापारी धोरण, शाहू फुले आंबेडकर यांच्या दृष्टिक्षेपातील छत्रपती शिवराय या आणि अशा अनेक विषयांवर भारतातले अनेक मान्यवर अभ्यासक आपले मत व्यक्त करणार आहेत. याच संमेलनाच्या माध्यमातून आपण काही प्रस्ताव पारित करीत आहोत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वास्तववादी इतिहास वर्तमान समाजाला योग्य पद्धतीने हस्तांतरीत करावा.
या अपेक्षेने शासनाने कारवाई करावी तसेच शिवकालीन अभ्यासासाठी उपयुक्त असणाऱ्या भाषा संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष प्रयत्न करावे असे विविध सात प्रस्ताव या संमेलनाच्या माध्यमातून समाज क्षेत्राच्या पटलावर मांडल्या जाणार आहेत. हे संपूर्ण संमेलन नूतन मराठा महाविद्यालय जळगाव येथे होणार असून इतिहास प्रबोधन संस्था महाराष्ट्र आणि नूतन मराठा महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच वनसंपदा बहुउद्देशीय संस्था धरणगाव, राधेश्याम एज्यूसोशल फाउंडेशन छत्रपती संभाजी नगर, गड संवर्धन प्रतिष्ठान पुणे, कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषद महाराष्ट्र, आणि श्री. दादासाहेब केशवराव भोईटे इतिहास संशोधन मंडळ जळगाव यांच्या सहकार्याने हे संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शोधनिबंधाचे एक उच्चस्तरीय ग्रंथ निर्मिती करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य, विचार याबाबतीत असणाऱ्या महत्त्वाच्या २९ विषयावर संदर्भ ग्रंथरूपामध्ये वेगवेगळे संशोधक, प्राध्यापक, प्राचार्य यांच्याकडून आलेले लेख संकलन करून त्याचे ग्रंथरूपामध्ये प्रकाशन करणार आहोत त्याचा उपयोग निश्चितच पुढील पिढीला अभ्यासाकरिता / संशोधनाकरीता होणार आहे.
तसेच या शिवचरित्र साहित्य संमेलनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर वेगवेगळ्या प्रकाशकांनी प्रकाशन केलेल्या ग्रंथांचे चार दिवसांमध्ये शिवचरित्र साहित्य संमेलनाच्या कालावधीमध्ये सहभागी होणाऱ्या प्राचार्य प्राध्यापक संशोधक तसेच वाचक यांना या शिवसाहित्याचा उपयोग होणार आहे. याकरिता या साहित्य संमेलनामध्ये ग्रंथदालन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राच्या बाहेरील पुस्तक विक्रेते प्रकाशक आपला सहभाग घेणार आहेत. आपण जास्तीत जास्त संख्येने या संमेलनात सामील व्हावे असे आवाहन या निमित्ताने करण्यात येत आहे असे या संमेलनाचे निमंत्रक मा. प्राचार्य लक्ष्मणराव देशमुख आणि या संमेलनाचे नियंत्रक श्री.रवींद्र पाटील पाचोरा इतिहास प्रबोधन संस्थेच्या सचिव सौ. भारती साठे यावल यांनी कळविले आहे
प्राचार्य डॉ लक्ष्मण प्र. देशमुख
ज. जि. म. वि. प्र. मर्या. कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, जळगाव.
(नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव)
मा. व्यवस्थापन परिषद सदस्य
क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव