जळगाव / प्रतिनिधी :- लखलखत्या तेजाचा उत्सव असणाऱ्या दिवाळीच्या प्रारंभी रसिकांसाठी जळगाव येथील सुप्रसिद्ध ” सुबोनियो ” परिवाराने शब्दस्वरांची अनोखी मैफील आयोजित केली आहे.
दिवाळीची पहाट सांगीतिक कार्यक्रमाने खुलवण्याची पद्धत आज सर्वदूर रूढ झाली आहे. ‘दिवाळी पहाट’ म्हणजेच दीपोत्सवादरम्यान सकाळी-सकाळी आयोजित होणारा देखणा भक्तिमय कार्यक्रम…! अनेक वर्षांपासून जळगाव शहराला सांस्कृतिक-संगीत- कलाविषयक कार्यक्रमाची परंपरा सुरु आहे. या दिवशी लोक.. सांस्कृतिक रुपाने एकत्र येत मराठी भक्ती आणि भावगीतांचा आनंद घेतात. हा आनंद शहरातील लोकांना आणि दिवाळीचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी होत असतो.. सुबोनियो परिवाराने गेल्या अनेक वर्षांपासून सांस्कृतिक , सामाजिक कार्यक्रम , खवय्येगिरी विषयक आणि पर्यावरणाबाबत जनजागृतीचे यशस्वी उपक्रम राबविले आहेत..हे विशेष…! दि.1 नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी 6 वाजल्यापासून जळगावातील श्री कालिका माता मंदिर परिसर भुसावळ रोड ,एच.डी.एफ.सी बँकेशेजारील प्रांगणात ” दिवाळी पहाट ” सूर सुमनांची सुरेल उधळण…! चे आयोजन करण्यात आले आहे.
या माध्यमातून एकजुटतेचा आनंद साजरा करण्याच्या विचारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ,असे “सुबोनियो ” चे संचालक उद्योगपती सुबोधकुमार चौधरी यांनी सांगितले. ” दिवाळी पहाट ” सारख्या अनोख्या मैफलीत नव्या पिढीतीतील सुपरिचित कलाकार व निवेदक तुषार वाघुळदे , वैशाली पाटील ( शिरसाळे ), डॉ.गिरीश पाटील ,ज्ञानेश्वर पाथरवट ,मयूरकुमार हे आपल्या गीतांमधून लोकांना मंत्रमुग्ध करतील. तर शुभम चव्हाण , अमोल देवरे , नितीन पाटील , सर्व्हेश चौक, नेहा राणे , श्रावणी सरोदे यांची साथसंगत लाभणार आहे. या मैफिलीचे निवेदन ,संकल्पना आणि संगीत संयोजन ऑर्केस्ट्रा सेव्हन स्ट्रिंग्सचे संचालक तुषार वाघुळदे यांचे आहे. या शहरातील नागरिकांना प्रत्येक दिवाळीत अशा संगीतमय कार्यक्रमाची प्रतीक्षा व उत्सुकता असते. त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे..आणि सुमधुर स्वर सोहळ्याची मेजवानी मिळणार आहे.
तसेच एकाहून एक सरस भक्तिगीत व भावगीते आणि अभंग,गवळण अशा गाण्यांमुळे सकाळचे आल्हाददायक आणि चैतन्यामय वातावरण संगीतमय होईल. मराठी संगीतात संस्कृती आणि परंपरेची झलक पाहायला मिळेल. या कार्यक्रमामुळे शहरातील नागरिकांची दिवाळी खास ठरणार आहे
रसिकांसमोर बहारदार गाण्यांची सांगीतिक मेजवानी पेश होणार असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.जळगावकर प्रेक्षक आणि दिवाळी पहाट याचे अतुट नाते आहे. हा कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय दिवाळी झाली असे वाटतच नाही, असेच जळगावकर म्हणतील.कालिका माता चौक परिसरात होणाऱ्या दिवाळी पहाट या भक्तिमय गाण्यांच्या सोहळ्याला नागरिक तसेच रसिक-प्रेक्षकांनी दि.1 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता आवर्जून उपस्थिती द्यावी आणि संगीतमय मैफिलीचा लाभ घ्यावा असे आवाहन ” सुबोनियो ” परिवारातर्फे करण्यात आली आहे. 🙏 संपर्क 9405057141