जळगाव दि. ७ – स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने पं.वसंतराव चांदोरकरांच्या २३ व्या स्मृती दिनाच्या पूर्व संध्येस म्हणजे रविवार दि. ७ जुलै २०२४ “विरासत” मैफिलीचे आयोजन केले होते.
या मैफिलीस भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचे सहकार्य लाभले होते. कांताई सभागृहात रंगलेल्या मैफिलीची सुरवात प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार दीपक चांदोरकर यांच्या गुरुवंनदनेने झाली. दीपप्रज्वलन बहिणाबाई चौधरी उमवी चे कॉमर्स अँड मॅनेजमेंट विभागाचे डिन डॉ. अनिल डोंगरे व प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांच्याहस्ते झाले. कलावंतांचा सत्कार उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर, डॉ. अनिल डोंगरे व सचिव अरविंद देशपांडे यांनी केला.
अभिजात संगितात बखले घराण्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या स्व. पं. वसंतराव चांदोरकर यांच्या स्मृतींची आठवण केली गेली.या परंपरेतील कलाकारांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम म्हणजेच *विरासत* देवगंधर्व भास्करबुवा बखले हे सौ. शिल्पा पुणतांबेकर व सौ. सावनी दातार कुळकर्णी यांचे पणजोबा. त्यांनी गायलेले राग, संगीतबद्ध केलेली नाट्यपदे, अभंग, भक्तिगीते, भावगीते, गवळणी पासून ते लावणीपर्यंतचा वारसा, किंवा विरासत चा कॅनव्हॉस उलगडून दाखविला.
कार्यक्रमाची सुरुवात भूप रागातील ‘फुलवन सेज सवारू’ या बंदीशीने झाली व त्यालाच जोडून तरणा सादर केला गेला. त्यानंतर सं. स्वयंवर नाटकातील ‘ सृजन कसा मन चोरी’ हे नाट्यपद सादर केले याचे संगीत देवगंधर्व भास्करबुवा बखले यांचे आहे. त्यानंतर छोटा गंधर्व यांनी संगीतबद्ध केलेला ‘बोलू ऎसे बोले’ हा अभंग सादर झाला. त्यानंतर पु. ल. देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेले व माणिक वर्मा यांनी गाऊन अजरामर केलेले भावगीत ‘हसले मनी चांदणे’ हे सादर झाले. पं. भास्करबुवांचे पट्टशिष्य संगीतकलनिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी संगीतबद्ध केलेले व जेष्ठ गायिका कै. जोत्सना भोळे यांनी गायलेले कुलवधू नाटकातील ‘ क्षण आला भाग्याचा’हे नाट्यपद सादर झाले. त्यानंतर मानापमान नाटकातील ‘ शुरा मी वंदिले’ हे पद सादर झाले. आग्रा घराण्याची सुप्रसिद्ध सोहनी रागातील बंदिश सादर झाली. बाळासाहेब माटे यांनी संगीत देऊन जोत्सना बाईनी गायलेली ‘ कुणीतरी सांगा जे’ ही गवळण सादर झाली. चित्रपट संगीतात मास्टर कृष्णा यांनी संगीत दिलेले ‘आता कशाला उद्याची बात’ हे गीत सादर झाले. यानंतर श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेला रामदास स्वामींचा ‘ताने स्वररंग व्हावा’ हा अभंग सादर झाला. विरासत कार्यक्रमाची सांगता सं. कान्होपात्रा नाटकातील ‘अगा वैकुंठीचे राया’ या अभंगाने झाली.
शिल्पा व सावनी यांना तितकीच दमदार साथसंगत केली ती समीर पुणतांबेकर (तबला) अमेय बिच्चू (संवादिनी) डॉ. राजेंद्र दूरकर (पखावज) स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन यांच्या सहकार्याने सादर झालेली ही मैफल तमाम जळगावकर रसिकांना सुखावून गेली.