जळगाव (प्रतिनिधी) : गेल्या १० वर्षात केलेल्या कामांची पावती म्हणून आज मी विजयाची “हॅट्ट्रिक” साधून विजय केवळ जळगावकरांच्या आशीर्वादाने प्राप्त केला आहे. पुढील काळात उर्वरित प्रलंबित कामांसह नवीन विकासकामांना गवसणी घालण्याचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन आ. राजूमामा तथा सुरेश दामू भोळे यांनी व्यक्त केले.
आ. राजूमामा भोळे यांना विजयी झाल्यावर प्रांत तथा निवडणूक अधिकारी विनय गोसावी यांनी प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले. त्यानंतर आ. राजूमामा भोळे माध्यमांना माहिती देत होते. विजयासाठी मेहनत घेणारे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, रिपाई (आठवले), लोकजनशक्ती पक्ष, पिरीप आदी महायुतीतील घटकांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांचेही आ. राजूमामा भोळे यांनी आभार मानले आहे.
मागील १० वर्षांच्या काळात ५० टक्के कामे पूर्ण करून २५ टक्के कामांचे भूमिपूजन झाले आहे. या भूमिपूजन झालेल्या कामांची पुर्णता पुढील काळात नक्कीच केली जाणार आहे. तर २५ टक्के कामे प्रस्तावित असून त्यालाहि पूर्णत्व देण्यासाठी पाठपुरावा जाईल, अशीही माहिती आ. राजूमामा भोळे यांनी दिली.