जळगाव – दि.३(धर्मसाथी न्यूज नेटवर्क)गोसेवेसह अपघातग्रस्त गरजू रुग्णाना मोफत साहित्य पुरवठा करणाऱ्या आशेचा किरण ठरलेल्या मांगल्य सेवा संस्थेतर्फे श्री नवरात्र उत्सवाचे निमित्ताने श्रीदेवीची उपासना सुलभ व्हावी या हेतूने साडेतीन शक्ती पिठाच्या देव्यांचे स्तोत्र व आरती संग्रहाचे उत्तम संकलन केलेल्या रंगीत पुस्तिकेचे प्रकाशन जुने श्रीराम मंदिर संस्थानात विद्यांमन गादीपती श्री मंगेश महाराज यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या प्रसंगी जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने,ब्रह्मश्री संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक वाघ,अध्यक्ष कमलाकर फडणीस,मेरिको इंडस्ट्रीजचे अधिकारी किरण कुळकर्णी,प्रशांत कुळकर्णीसर,बांधकाम व्यवसायिक भूपेश कुळकर्णी,राजेश कुळकर्णी,ब्राह्मण जोडो अभियान राबवणारे प्रसाद निशाणदार,स्वानंद कुळ कर्णी ,सौ.कल्याणी कुळकर्णी,सौ.प्राची कुळकर्णी,सौ. स्वाती कुळकर्णी,आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचा प्रारंभ श्रीराम पूजनाने झाला.तसेच श्री.मंगेश महाराज यांचा सत्कार श्री किरण कुळकर्णी व श्री प्रवीण कुळकर्णी यांनी शाल श्रीफळ देवून केला. संस्थेचे उपाध्यक्ष श्री रवींद्र कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात मांगल्य सेवा संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती उपस्थितांना करून दिली.त्यानंतर मनोगतात मेरीको इंडस्ट्रीजचे किरण कुळ कर्णी यांनी श्रीनवरात्री उत्सव स्तोत्र, मंत्र संदर्भात शास्त्रीय माहिती देवून संस्थेच्या या पुस्तिकेच्या संकल्पनेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.संस्थेचे अध्यक्ष प्रवीण कुळकर्णी यांनी संस्थेचा सामाजिक व रुग्ण उपयोगी कार्याची माहिती देत श्री देवी स्तोत्र व आरती संग्रह पुस्तिका संस्थेतर्फे प्रकाशित करून शहरातील विविध भागातील देवस्थानात तसेच भाविक भक्तांना मोफत वितरित करून धार्मिक सेवेत हातभार लावत असल्याचे सांगितले.
संस्थेच्या या मोफत वितरण उपक्रमाला भरीव सौजन्य देणारे सतीश मदाने यांनी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या व यासामाजिक धार्मिक सेवा कार्याची प्रशंसा केली.संस्थेचे सचिव श्री.किरण कुळकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद जोशी यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
मांगल्य संस्थेतर्फे आयोजित या मोफत वितरण पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.