नाशिक, दि. २८ : राज्य अधिस्वीकृती समितीच्या माध्यमातून राज्यभरातील पत्रकारांच्या प्रश्नांना सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून हे प्रश्न निश्चितपणे मार्गी लावले जातील, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांनी केले.
नाशिक येथे आजपासून राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीस प्रारंभ झाला. यावेळी बैठकीच्या प्रारंभी मनोगत व्यक्त करताना श्री. जोशी बोलत होते. बैठकीच्या सुरुवातीला नाशिक विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुधीर लंके आणि सदस्य किरण लोखंडे, अभिजीत कुलकर्णी, विजयसिंह होलम, चंदन पुजाधिकारी यांनी समितीचे स्वागत केले. त्यानंतर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने संचालक हेमराज बागुल आणि कोकण विभागाचे उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी अध्यक्ष श्री. जोशी यांचे स्वागत केले.
श्री. जोशी म्हणाले, राज्यभरातील पत्रकारांचे विविध प्रश्न आहेत. ज्येष्ठ पत्रकारांसाठी अधिस्वीकृती मिळण्याबाबत निवृत्तीचे वय व अनुभव प्रमाणपत्राची समस्या, श्रमिक पत्रकारांना अनुभवाचा पुरावा मिळण्यात येणाऱ्या अडचणी, आदीबाबत वेळोवेळी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जातो. राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर ज्येष्ठ पत्रकारांना देण्यात येणाऱ्या सन्मान निधीचा विषय मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. लंके यांनी समितीचे स्वागत करतांना समितीच्या माध्यमातून पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी समितीने सहकार्य आणि मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
राज्य अधिस्वीकृती समितीची ही बैठक दोन दिवस चालणार असून यामध्ये पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या अधिस्वीकृती पत्रिकेसाठी आलेल्या अर्जांची छाननी करून राज्य शासनाकडे शिफारस केली जाते.
बैठकीच्या सुरुवातीस नाशिक विभागाचे उपसंचालक डॉ. किरण मोघे यांनी राज्य अधिस्वीकृती समितीचे सर्व सदस्य आणि विविध विभागाचे उपसंचालक यांचे स्वागत केले.