जळगांव- दि.२१. शहरातील बळीराम पेठेतील श्रीगणेश उत्सवात भव्य स्वरूपातील धार्मिक ,सामाजिक,राष्ट्रीय संदेश देणाऱ्या आरास उभारणी करून समाजाचे प्रबोधन करण्यात अग्रेसर असलेल्या नावलौकिक प्राप्त आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी नदीजोड प्रकल्पाची उत्कृष्ट आरास करून विद्यार्थ्यांसह समाजाला नदीजोड प्रकल्पाचे महत्त्व पटवून देत मौलिक संदेश सामान्य जनतेला सुलभ मांडणीतून दिला यासाठी जिल्हा पोलिस दलातर्फे निवड करण्यात येवून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक २१०००/-धनादेश व स्मृतिचिन्ह देवून मंडळाला पोलिस मल्टीपर्पज हॉल येथे सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी उत्साहपूर्ण वातावरणात जिल्हा पोलिस दलाच्या नूतनीकरण झालेल्या पोलिस मल्टिपर्पज हॉल येथे शहरातील विविध नावाजलेल्या गणेश मंडळाच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
त्यात जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या शुभहस्ते इतर पोलिस वरिष्ठ अधिकारी अतिरिक्त पोलिस अधी.अशोक नखाते, श्री संदीप गावित ,सार्वजनिक गणेश महामंडळाचे अध्यक्ष श्री सचिन नारळे , श्री दिपक जोशी यांच्या उपस्थितीत सायंकाळी आयोजित पारितोषिक वितरण कार्यक्रमात हे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक धनादेशाच्या स्वरूपात आझाद क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानपूर्वक देण्यात आले.
यापूर्वी एका राज्यस्तरीय नामांकित वृत्तवाहिनी तर्फे उत्तर महाराष्ट्रातून नदीजोड प्रकल्पाचा उत्कृष्ट आरास देखावा सादरीकरण साठीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळाला नुकताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद ,प्रसिद्ध उद्योगपती अशोकभाऊ जैन यांच्या विशेष उपस्थितीत देण्यात आला आहे.
यावेळी आझाद मंडळाचे अध्यक्ष आश्विन भोळे,उपाध्यक्ष महेश पाटील,सचिव मयूर विरपणकर,रुपेश पाटील,विपिन पवार,मयूर रतवेकर,ललित भोळे,निर्भय पाटील,नितीन चंदनकर,राज चंदनकर,गौरव चंदनकर,राज खंडेलवाल,यांचेसह इतर कार्यकर्त्यांनी जळगांव जिल्हा पोलिस दलातर्फे तो सन्मान स्वीकारला. व जळगावच्या चिंतामणीचा जयघोष करीत जल्लोष केला.