रोटरी क्लब जळगावला आयोजनाचा बहुमान
जळगाव- रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चा प्रशस्ती हा अवॉर्ड वितरण सोहळा रविवार दि.४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत महाबळ रोडवरील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला आहे.
अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या रोटरी क्लब जळगावला या सोहळ्याचे जळगावात आयोजन करण्याचा बहुमान मिळाला आहे. या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून माजी अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी तर सह-संयोजक म्हणून असिफ मेमन जबाबदारी पहात असल्याची माहिती अध्यक्ष अॅड. सागर चित्रे व मानद सचिव पराग अग्रवाल यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० मधील १०० विविध क्लबने २०२३-२४ या वर्षात केलेल्या उल्लेखनीय कामाचे कौतुक या सोहळ्यात करण्यात येणार आहे. क्लब सदस्य संख्येनुसार तीन वेगवेगळ्या गटातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या क्लबला सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे
रोटरी वर्ष २०२३-२४ च्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आशा वेणूगोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पाच सदस्यीय अवॉर्ड समितीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे.
नागपूर ते नाशिक कार्यक्षेत्रातील १०० क्लबच्या सदस्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. कार्यक्रमानिमित्त क्लबच्या सदस्यांच्या वेगवेगळ्या समिती स्थापन करून यशस्वितेसाठी रोटरी क्लब जळगाव प्रयत्नशील असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.