जळगाव दि.२९ तायक्वांडो असोसिएशन बिड व तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५ ते २७ दरम्यान बिड येथे ३४ व्या कनिष्ठ (ज्युनियर) मुलं व मुली यांच्या राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते दीपप्रज्जवलन करून करण्यात आले. यावेळी तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेश करा, उपाध्यक्ष दुलीचंद मेश्राम, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रवीण बोरसे हे उपस्थित होते.
या स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचा संघ सहभागी झाला होता. मुलींच्या ५२ किलो आतील वजन गटात जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या कु. निकीता दिलीप पवार हिने रौप्य पदक प्राप्त केले. रावेर तालुका असोसिएशनचा लोकेश महाजन यानेसुद्धा रौप्यपदक पटकावले त्यांना प्रशिक्षक जयेश बाविस्कर जळगाव, तसेच जयेश कासार यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. यांच्या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, महासचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य महेश घारगे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.