जळगाव – येथील कै. भालचंद्र शंकर जहागिरदार प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ डॉक्टर म्हणून गुरुपौर्णिमेनिमित्त आरोग्यदीप किडनी फाउंडेशनच्या संस्थापक व आयएमए जळगावचे उपाध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे यांचा सुप्रसिद्ध किडनीविकार तज्ञ डॉ. सुधीर कुलकर्णी (संभाजीनगर) यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
१९९४ पासून दरवर्षी जहागिरदार प्रतिष्ठानतर्फे गुरु पौर्णिमेनिमित्त व्याख्यानमाला व ज्येष्ठ डॉक्टरांचा सत्कार करण्यात येतो.त्यात आजपर्यंत ८० वक्ते व ७० डॉक्टरांचा सत्कार केल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. जयंत जहागिरदार यांनी यावेळी सांगितले.
व्यासपीठावर रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेनन, चेअरमन विनोद बियाणी, रोटरी जळगाव वेस्टचे अध्यक्ष विनीत जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना डॉ.गाजरे यांनी जहागिरदार प्रतिष्ठान म्हणजे वैद्यकीय जागृती करणारी चळवळ आहे. मराठवाडा विभागातील किडनी आजाराचे गुरु समजले जाणाऱ्या डॉ. कुलकर्णी यांच्या हस्ते झालेला सत्काराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
प्रतिष्ठानच्या सचिव माधुरी जहागिरदार यांच्या हस्ते रजनी गाजरे यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. आनंद दशपुत्रे यांनी केले.
कार्यक्रमास इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव शाखा व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांचे सहकार्य लाभले.