जैन हिल्सवरील केळी रोग व्यवस्थापन चर्चासत्रात शास्त्रज्ञांचे विचारमंथन
जळगाव – दि.२१ शेतकऱ्यांना सर्वात जास्त अर्थांजनासह ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणारे पीक म्हणजे केळीकडे बघितले जाते. केळीमध्ये नवनवीन संशोधन सुरु असताना देशात बिहार, उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये केळीवरील फ्युजारीयम विल्ट रोगाचा प्रादुर्भाव व धोका वाढताना दिसत आहे. केळीवरील फ्युजारीयम विल्ट रोगाने फिलपीन्स, इंडोनिशीया, चिन, ऑस्ट्रेलिया, होंडूरस, कोलंबिया, तैवान, इस्त्राईल, नेपाळ, पाकिस्तान यासह अनेक देशातील केळी बागा उध्वस्त केल्या आहे. त्यामुळे केळीचे उत्पादन घटत आहे. म्हणून या रोगाला कसे ओळखाचे, आपल्या परिसरात रोगाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून काय प्रतिबंधात्मक उपाय करायचे व रोग व्यवस्थापन कसे करावे, जेणे करुन भविष्यात केळी पीक शाश्वत राहिल; यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया (CHAI), नवी दिल्ली, ICAR-राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र ,(NRCB) त्रिची यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जैन इरिगेशन सिस्टीम लि. यांच्या सहकार्याने ‘केळीवरील फ्युजारीयम विल्ट, टी आर-४ रोग व्यवस्थापन’ विषयावर एक दिवसीय चर्चासत्रात शास्त्रज्ञांसह प्रयोगशील शेतकऱ्यांनी विचार मंथन केले.
जैन हिल्सस्थित कस्तुरबा सभागृह येथे झालेल्या चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून केंद्र सरकारचे माजी उद्यान आयुक्त व कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. एच. पी. सिंग उपस्थित होते. कार्यक्रमात प्रमुख वक्ते राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र त्रिची चे वरिष्ठ शास्त्रज्ञ (वनस्पती रोग) डॉ. आर. थंगवेलु, माजी संचालक डॉ. बी. पद्मनाथन, बिहारच्या डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठमधील वनस्पती रोग शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. के. सिंग, जळगावचे जिल्हा कृषी अधीक्षीक कृषी अधिकारी कुरबान तडवी, जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल पाटील, डॉ. बिरपाल सिंग, प्रयोगशील शेतकरी धिरेंद्रभाई देसाई, प्रेमानंद महाजन उपस्थित होते.
तर पॅनल चर्चेत मान्यवरांसह डॉ. ललित महात्मा, डॉ. बी. के. यादव, किशोर चौधरी, प्रफुल्ल महाजन, विशाल अग्रवाल, गोपाल पाटील खामनी, विनायक पाटील, किशोर महाजन, संतोष लचेटा, हरदिपसिंग सोलंकी, निखील ढाके, कमलाकर पाटील, पवन पाटील, रितेश परदेशी, गम्पाशेठ चौधरी, रविंद्र पाटील, विशाल पाटील, सुनील पाटील, सुधाकर पाटील, अमित पाटील यांच्यासह शेतकरी सहभागी झालेत.
मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने चर्चासत्राची सुरवात झाली. शाल, सूतीहार, गांधीजींची प्रतिमा देऊन मान्यवरांचे स्वागत झाले. प्रास्ताविक डॉ. के. बी. पाटील यांनी केले. जळगाव, धुळे, बुऱ्हाणपूर, बडवाणी, नर्मदानगर या जिल्हांसह गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. शेतकऱ्यांना सहभागाबाबत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.