जळगाव, दि. २१– ‘टाळांची किण किण, मृदंगाचा नाद, विणेच्या तारेतून निघालेला तो मंद स्वर, जोडीला पंडीत भिमसेन जोशी यांच्या स्वरातली अजरामर अभंगवाणी तसेच रामकृष्ण हरी, आदी शक्ती मुक्ताबाई की जय हा जय घोष…’ यामुळे जैन हिल्स येथील व्हीआयपी गेटचा परिसर भक्तीमय झाला नाही तर नवलच! हा प्रसंग आहे श्रीराम मंदिर संस्थान (कान्हदेशद्वारा संचालित) जळगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या वारीच्या स्वागताचा!
गेल्या दोन दशकांहून अधिक वर्षांपासून श्रीराम मंदिर संस्थानच्या पंढरीसाठी निघालेल्या पायी पालखी, वारीचे स्वागत पौर्णिमेच्या नियोजित दिवशी करण्यात येते. रितीरिवाजानुसार जैन हिल्सच्या व्हीआयपी गेटजवळ पोहोचली. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीतर्फे जैन परिवारातील सौ. ज्योती अशोक जैन, सौ. निशा अनिल जैन, सौ. शोभना अजित जैन तसेच अथांग व सौ. अंबिका जैन यांच्यासह कंपनीतील वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांतर्फे भव्य स्वागत करण्यात आले. जैन परिवारातील सदस्यांनी श्रीसंत मुक्ताबाई यांच्या पादुकांची पूजा केली. त्यानंतर सुलभा जोशी, मानव संसाधन विभागाचे पी. एस. नाईक, जी आर पाटील, एस. बी, ठाकरे, राजेश आगीवाल, सिक्युरिटी विभागाचे प्रमुख आनंद बलौदी, आर. डी. पाटील, एम.पी बागुल, संजय सोनजे, अजय काळे, जीआरएफचे विश्वस्त डॉ. सुदर्शन अयंगार, समन्वयक उदय महाजन, डॉ. आश्विन झाला, अब्दुलभाई, गिरीश कुळकर्णी यांच्यासह जैन हिल्स येथील सुमारे ४०० स्त्री-पुरुष सहकाऱ्यांनी पालखीचे दर्शन घेतले. मेहरुणच्या शिवाजी उद्यानातील संत मुक्ताबाई मंदिरात पुजेचा मान जैन इरिगेशनला दिला जातो. यावर्षी कंपनीच्यावतीने सहकारी अनिल जोशी यांच्याहस्ते ही पूजा केली गेली.
कंपनीच्यावतीने राजाभोज खानपान विभागाचे प्रमुख विजय मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी भीमराव दांडगे व सहकाऱ्यांनी वारकऱ्यांच्या फराळाची व्यवस्था केली. जैन इरिगेशन सिस्टीम्स कंपनीने या यात्रेबरोबर संत मुक्ताबाईंच्या पालखीबरोबर मदत म्हणून एक मालवाहू वाहन तसेच दिंडीची उत्तम क्षणचित्रे उपयोगात आणून कला विभागातर्फे उत्तम अशी सजावट केलेल्या प्रवासी वाहनाची उपलब्धता करून दिली आहे, हे वाहन पालखी बरोबरच जाईल. या पालखीची स्थापना १७९४ला झाली तेव्हापासून अखंडपणे हा पालखी सोहळा होत असतो. दरवर्षी ही वारी जात असताना जैन हिल्स येथे आदरातीथ्य स्वीकारून पुढे मार्गस्थ होते.
आजच्या या स्वागताचे वैशिष्ट्य असे की, आध्यात्म आणि पायी चालण्याचे, वारीचे महत्त्व प्राथमिक, माध्यमिक विद्यार्थ्यांना समजावे यासाठी डॉ. अविनाश आचार्य स्कूल, भ.गो. शानभाग स्कूल आणि काशिनाथ पलोड हायस्कूच्या विद्यार्थ्यांचा देखील सहभाग करून घेण्यात आला होता. वारकरी स्त्री-पुरुष पारंपरिक वेषात सहभागी विद्यार्थ्यांमुळे वारीला खरा अर्थ प्राप्त झाला.