एखादी व्यक्ती मनाप्रमाणे मोक्षप्राप्तीच्या लक्ष्याकडे जात असताना शंका, किंतु-परंतु ज्या मनुष्यात असते ते अर्ध्या रस्त्यामध्ये थांबून जातात. त्यालाच आपले घर मानतात. आपल्या सामर्थ्याला, बुद्धिला, पैसा, पद, प्रतिष्ठेला, संसाराला ‘शाश्वत’ घर मानतात. सामाजिक मापदंड सोडून फक्त ‘धन’ यावर आधारित निर्णय घेत असतात आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग संशयशील बनवतात. यातूनच अहंकार, अहंम भाव वाढतो आहे.
गृहप्रवेशच्या नावाखाली गृहप्रदर्शन होत असून वास्तविक ती अहं आणि प्रशंसाची भूक आहे. आधी अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा होत्या मात्र आता आधी लाडी, वाडी, गाडी या तीन मुलभूत गरजा काळानुरुप होत आहेत. त्यातही आधी गाडी, वाडी आणि त्यानंतर लाडी ही सामाजिक विचारधारा समाजामध्ये वाढत आहे. ह्यावर चिंतन झाले पाहिज
‘चक्रवर्ती’ पेक्षा आपण मोठे हा अहं भाव निर्माण होत आहे. पद, पैसा, प्रतिष्ठा असताना ती कुठे आणि कशासाठी वापरतोय हे लक्षात घेतले पाहिजे. आयुष्याची जमापूंजी गोळा करुन निर्माण केलेले घर, बंगला टिकणारा नाही, जे घर, बंगला निर्माण करणारे आहेत ते सुद्धा त्यात कायम राहणार नाहीत. त्यात कायम राहणारेसुद्धा टिकणार नाहीत. आपल्यातील आत्माला जाण्यासाठी मेन गेट ची आवश्यकता राहत नाही. त्यामुळे मुलभूत गरजांच्या गरजेपुरताच वापर करुन शाश्वत परमार्थ शोधा, शाश्वत धाम शोधा! त्यासाठी नमी राजाचे प्रेरणादायी उदाहरण शासनदीपक परमपुज्य सुमितमुनिजी महाराज साहेब यांनी स्वाध्याय भवन येथील धर्मसभेमध्ये श्रावक-श्राविकां समोर दिले.
मनुष्य हा यशस्वीता आणि अयशस्वीता यावर मापदंड ठरवित असतो. मात्र प्रत्यक्षात आत्मविश्वास आणि दृढनिश्चय, साहस, पुरुषार्थ यावर मापदंड ठरले पाहिजे. आत्मविश्वास मजबूत असेल तर शिखर गाठता येते आणि आत्मविश्वास कमी असेल तर छोट्यातील छोटे काम सुद्धा पहाडासारखे कठिण लागू लागते. आपल्यातील अनंत शक्ती जागृत करुन आत्मचैतन्याची अनुभूती घेतली पाहिजे. आत्मज्योत जागृत झाल्यावर कुठलेही कार्य हे सफल झाल्याशिवाय राहत नाही. यातून विधायक कार्याचे साहस प्राप्त होते आणि आपल्या हातून पुरुषार्थ घडतो. असे विचार प्रवचनाच्या आरंभी प.पू.श्री भुतीप्रज्ञमुनिजी म. सा. यांनी व्यक्त केले.
स्वाध्याय भवन, जळगाव
_शब्दांकन – देवेंद्र पाटील, प्रसिद्धी विभाग जैन इरिगेशन. जळगाव_